Spread the love

इशान-तिलकची तुफानी फलंदाजी, गोलंदाजांची कमाल; भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय

इशान किशनचे ८१, तिलक वर्माचे नाबाद ६०; ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताची अभेद्य आघाडी

धीरज सेतवाल हरारे | वृत्तसंस्था

इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या आक्रमक अर्धशतकांनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा तब्बल ९० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा महत्त्वपूर्ण मालिका विजय ठरला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीला दोन धक्के बसल्यानंतर डाव सावरला. अभिषेक शर्मा ८ धावांवर, तर वैभव सूर्यवंशी २० धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (२५) आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत संघाला सावरले.

अय्यर बाद झाल्यानंतर तिलक वर्माने इशान किशनला उत्तम साथ दिली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या ४३ चेंडूत ९४ धावांची तुफानी भागीदारी रचली. इशान किशनने ४४ चेंडूत ८१ धावांची खेळी करत ९ चौकार आणि २ षटकार लगावले, तर तिलक वर्माने केवळ २९ चेंडूत नाबाद ६० धावा फटकावत भारताला २० षटकांत ५ बाद २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही. पदार्पण करणाऱ्या यश ठाकूरने ब्रायन बेनेट (३२) याला बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर बेन कारन (१), डायोन मायर्स (१२), कर्णधार सिकंदर राजा (०) आणि वेस्ली मधेवेरे (२) यांना स्वस्तात बाद करत भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला सतत धक्के दिले.

झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १७.५ षटकांत अवघ्या १२९ धावांवर गारद झाला आणि भारताने ९० धावांनी शानदार विजय नोंदवला.

या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली असून, मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version