Spread the love

पारोळ्यात शेतकरी संघटनेचा इशारा; १५ दिवसांत पीक विमा जमा करा, अन्यथा उपोषण!

खरीप २०२५ पीक विमा नुकसानभरपाई व ₹२ लाख प्रोत्साहन अनुदानाची मागणी; शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

पारोळा | प्रतिनिधी (सुरेश पाटोळे) :
खरीप २०२५ हंगामातील पीक विमा नुकसानभरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ₹२ लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना, पारोळा यांच्या वतीने तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खरीप २०२५ हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग आदी पिकांचा पीक विमा भरला होता. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून अद्यापही अनेकांना विमा नुकसानभरपाई मिळालेली नाही.

शेतकरी संघटनेने शासनाकडे मागणी केली आहे की, पीक विम्याची थकीत नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ₹२ लाखांचे प्रोत्साहन अनुदानही लवकरात लवकर मंजूर करून वितरित करण्यात यावे.

संघटनेने प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देत, या कालावधीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version