भडगाव पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तक्रारींचा पाढा; ग्रामसेवकांची मनमानी, अपूर्ण पाणी योजना आणि ‘पोखरा’ लाभावर प्रश्नचिन्ह
कनाशी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी, तलाठी बदलीचा ठराव; विविध विभागांच्या कारभारावर लोकप्रतिनिधींचा संताप
भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ) :
भडगाव पंचायत समितीत आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामसेवकांची मनमानी, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, गोठा शेड, ‘पोखरा’ योजनेचा लाभ, जन्म-मृत्यू दाखले तसेच महसूल विभागाच्या कामकाजावर नागरिक व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
बैठकीत वाडे गाव ‘डार्क झोन’मध्ये असल्याने शेतकऱ्यांना गोठा शेड आणि ‘पोखरा’ योजनेचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच कनाशी ग्रामपंचायतीकडे सुमारे ₹४५ लाखांचा निधी उपलब्ध असूनही विकासकामे रखडली असल्याची तक्रार करण्यात आली. ग्रामसेवक नागरिकांशी मनमानी वर्तन करत असून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही करण्यात आला. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाविरोधात कारवाई व बदलीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती देण्यात आली.
पांढरद येथील पाणीपुरवठा योजना कार्यकाळ संपूनही पूर्ण न झाल्याबद्दल संबंधित ठेकेदाराला तातडीने काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची मागणी करण्यात आली. पथराड येथे नियमित ग्रामसेवक नसल्यामुळे अनेक प्रशासकीय कामे रखडली असल्याची तक्रारही मांडण्यात आली.
याशिवाय पथराड गावातील मंजूर रस्त्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध होत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना मृत्यू दाखले वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही बैठकीत मांडण्यात आली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना तलाठी व्ही. पी. शिंदे जबाबदारी टाळत असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केल्याची माहिती देण्यात आली.
कजगाव येथे जन्मनोंदणी वेळेवर होत नसल्याबाबतही तक्रार करण्यात आली. तसेच महिला व बालविकास विभागाच्या कामकाजावरही उपस्थितांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बैठकीत विविध अपूर्ण शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांनी योजनांचा लाभ घेताना प्रशासनाशी समन्वय ठेवावा, जेणेकरून रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील, असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. मात्र तालुक्यातील काही ग्रामसेवक आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखिचंद पाटील, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, भैय्यासाहेब पाटील, संजय पाटील, समाधान पाटील, सुपडू खेडकर, सोमनाथ पाटील बोदर्डे, नगरसेवक विजयकुमार भोसले, जग्गू भोई, संतोष महाजन, इम्रानअली सैय्यद, सौरभ देशमुख, जगदीश पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
