Spread the love

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

युनेस्कोच्या ४८व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय; भारताच्या बौद्ध व सांस्कृतिक वारशाला जागतिक मान्यता

भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे) :
गौतम बुद्धांनी आपल्या जीवनातील पहिला धर्मोपदेश दिलेल्या ऐतिहासिक सारनाथ या बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage Sites) यादीत समावेश करण्यात आला आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या युनेस्कोच्या ४८व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भारताच्या समृद्ध बौद्ध आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे.

वाराणसीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेले सारनाथ हे जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. बोधगया येथे ज्ञानप्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्धांनी याच ठिकाणी आपल्या पाच शिष्यांना ‘धम्मचक्कप्पवत्तन सुत्त’ या नावाने ओळखला जाणारा पहिला धर्मोपदेश दिला होता. या उपदेशातून त्यांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्ग यांचा संदेश देत दुःखातून मुक्ती आणि निर्वाणाचा मार्ग जगासमोर मांडला. याच घटनेपासून बौद्ध धर्माच्या प्रसाराची औपचारिक सुरुवात झाल्याचे मानले जाते.

सारनाथचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित करणारी बाब म्हणजे सम्राट अशोकाने इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात येथे स्तंभ, स्तूप आणि विहारांची उभारणी केली. सारनाथ येथील अशोक स्तंभाचे सिंहशीर्ष हे आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे, तर भारतीय राष्ट्रध्वजावरील २४ आऱ्यांचे अशोकचक्र हे येथील धर्मचक्रावर आधारित आहे.

सारनाथमधील धम्मेक स्तूपचौखंडी स्तूपसारनाथ पुरातत्त्व संग्रहालय आणि इतर प्राचीन बौद्ध अवशेष भारताच्या समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जिवंत प्रतीक मानले जातात. गेल्या अडीच हजार वर्षांहून अधिक काळापासून हे स्थळ करुणा, प्रज्ञा आणि शांततेचा संदेश देत जगभरातील भाविकांना प्रेरणा देत आहे.

यापूर्वी वाराणसीला युनेस्कोकडून ‘सिटी ऑफ म्युझिक’ हा दर्जा मिळाला होता. आता सारनाथचाही जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने वाराणसीच्या जागतिक सांस्कृतिक महत्त्वात आणखी भर पडली आहे. या निर्णयामुळे बौद्ध पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच वारसा संवर्धन, संशोधन आणि पर्यटन सुविधांच्या विकासालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) संस्थेच्या संवर्धन कार्यालाही अधिक बळ मिळणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version