दापोरा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त नाथ बाबांचा भव्य-दिव्य पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून पालखीची मिरवणूक; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, तीर्थक्षेत्र दर्शनासाठी प्रस्थान
दापोरा (ता. जळगाव) | प्रतिनिधी : शैलेश गुरव
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त जळगाव तालुक्यातील दापोरा येथे नाथ बाबांचा भव्य-दिव्य पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवदुर्गा चौक येथून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर संपूर्ण गावातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पालखी मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण करत आणि आकर्षक रांगोळ्यांनी पालखीचे स्वागत केले. टाळ-मृदंग, ढोल-ताशांचा निनाद आणि ‘नाथ बाबांच्या जयघोषाने’ संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या सोहळ्यात नाथभक्त, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
या पालखी सोहळ्याचे आयोजन नाथभक्त विनोद दादा सोनवणे, रतिलाल बाबा सोनवणे, विशाल वरपे, गोकुळ सोनवणे, ऋषीदास वाणी, सुकदेव सपकाळे, राजेश सोनवणे, विशाल सोनवणे, वैभव काळे, गोलू बाविस्कर, नाना मोरे तसेच समस्त दापोरा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भाविक रवाना
पालखी सोहळ्यानंतर भाविकांनी नाथ संप्रदायातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी प्रस्थान केले. यामध्ये श्री क्षेत्र पैठण, श्री फणीफनाथ मठ, श्री मच्छिंद्रनाथ समाधी, श्री जालिंदरनाथ समाधी, श्री वृद्धेश्वर मंदिर, श्री गोरक्षनाथ गड, श्री क्षेत्र मोहटादेवी, श्री क्षेत्र काली मठ, श्री क्षेत्र देवगड, श्री घृष्णेश्वर मंदिर आणि श्री भद्रा मारुती या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची भक्तीपरंपरा, सामाजिक ऐक्य आणि अध्यात्माचा संदेश भाविकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
