Spread the love

डिजिटल युगात हस्तलिखित पत्रांची परंपरा जपली; भडगाव आदर्श कन्या विद्यालयाचा अभिनव उपक्रम

‘आई-वडिलांना पत्र लेखन’ उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; भावनिक अभिव्यक्तीतून जपले संस्कार आणि कौटुंबिक मूल्ये

भडगाव | प्रतिनिधी :

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात हरवत चाललेल्या हस्तलिखित पत्रलेखनाच्या परंपरेला नवसंजीवनी देण्यासाठी भडगाव येथील आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘आई-वडिलांना पत्र लेखन’ या संस्कारक्षम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये पालकांविषयी कृतज्ञता, कौटुंबिक मूल्ये, भावनिक अभिव्यक्ती आणि संवादकौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

मुख्याध्यापक सुरेश रोकडे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्ताक्षरात आपल्या आई-वडिलांविषयीचे प्रेम, आदर, कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त करणारी मनोगते पत्रांच्या माध्यमातून मांडली. अनेक विद्यार्थिनी पत्र लिहिताना आणि त्याचे वाचन करताना भावूक झाल्या, तर उपस्थित शिक्षकांच्याही भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी मुख्याध्यापक सुरेश रोकडे यांनी आजच्या डिजिटल युगात हस्तलिखित पत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये पालकांविषयी आदर, संवादाची सवय आणि भावनिक नातेसंबंध अधिक दृढ होतात, असे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी आई-वडिलांना दिलेली ही भावनिक भेट त्यांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सक्रिय सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ महाजन, मानद सचिव दीपक महाजन तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

दरम्यान, बदलत्या जीवनशैलीत मुलांमध्ये कौटुंबिक मूल्ये, संवेदनशीलता आणि संस्कार जोपासणारे असे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. विद्यार्थिनींमध्ये कृतज्ञता, आत्मीयता आणि कुटुंबाप्रती असलेली बांधिलकी वृद्धिंगत करणारा हा उपक्रम सर्वांच्या प्रशंसेचा विषय ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version