Spread the love

शालार्थ घोटाळ्यात एसआयटीची मोठी कारवाई; भाजप नेते संजय गरुड अटकेत

एका दिवसात १७७ शालार्थ आयडी तयार केल्याचा संशय; तपासाची व्याप्ती वाढणार, आणखी संस्थाचालक व अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता

जळगाव | प्रतिनिधी :

राज्यात गाजत असलेल्या कथित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा भाजप नेते संजय गरुड यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एसआयटीच्या तपासानुसार, संजय गरुड यांच्या संस्थेतील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आयडींच्या माध्यमातून शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय असून, त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून तपास यंत्रणेला चकवा देत असलेल्या संजय गरुड यांना नाशिक एसआयटीच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फ्लॅटमधून अटक केली. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणात यापूर्वी माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय गरुड यांच्यावरील कारवाई ही तपासातील दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. तपासादरम्यान आणखी काही संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून वर्तविण्यात येत आहे.

संजय गरुड हे जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले आणि जामनेर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवली. ३० जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

Share.
Leave A Reply

Exit mobile version