‘बाळासाहेबांचे विचार हेच माझ्या जीवनातील गुरुमंत्र’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
गुरुपौर्णिमेनिमित्त मंत्रालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन; ‘जनतेची निष्ठेने सेवा हीच खरी गुरुदक्षिणा’
मुंबई / जळगाव | प्रतिनिधी :
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, “बाळासाहेबांचे विचार हेच माझ्या जीवनातील गुरुमंत्र असून, जनतेची निष्ठेने सेवा करणे हीच त्यांना खरी गुरुदक्षिणा आहे,” असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याचा आवाज दिला, स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली आणि जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देण्याचे बळ दिले. त्यांच्या विचारांची सावली आजही आमच्या डोक्यावर आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आयुष्याला जन्म आई देते; मात्र आयुष्याला विचार, ध्येय आणि दिशा देणारा गुरु असतो. माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांच्या मनात स्वाभिमान जागवणारे, संघर्षाची प्रेरणा देणारे आणि जनसेवेचा मार्ग दाखवणारे बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरु आणि अखंड प्रेरणास्थान आहेत.”
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, बाळासाहेबांचे विचार कोणत्याही पदापेक्षा मोठे असून गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे हीच त्यांच्याप्रती खरी गुरुदक्षिणा आहे. एका सामान्य शिवसैनिकापासून मंत्रिपदापर्यंतचा प्रवास बाळासाहेबांच्या विचारांमुळेच शक्य झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, “आज सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक जबाबदारी आणि जनतेने व्यक्त केलेला विश्वास यामागे बाळासाहेबांनी दिलेले विचार, संस्कार आणि संघर्षाची प्रेरणा आहे. त्यांनी आम्हाला केवळ राजकारण नव्हे, तर माणसे जोडायला, संकटात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करण्याची शिकवण दिली.” गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या अभिवादन सोहळ्यात उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन केले.
