किनगाव–डांभर्णी रस्त्यावर अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
ट्रॅक्टरसह वाळू जप्त; चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील
यावल तालुक्यातील किनगाव–डांभर्णी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर यावल पोलिसांनी धडक कारवाई करत वाहनासह वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनगाव–डांभर्णी मार्गावर बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती यावल पोलीस पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर आणि त्यावरील वाळू जप्त केली. या प्रकरणी पोलीस हवालदार हितेश बागुल यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक तथा मालक विजय मधुकर साळुंखे (रा. कोळन्हावी, ता. यावल) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
