Spread the love

धुळ्याच्या लांडोर बंगल्यावर बाबासाहेबांच्या मुक्कामाला ८९ वर्षे; भीम स्मृती यात्रेला हजारोंची उपस्थिती

३१ जुलै १९३७ च्या ऐतिहासिक धुळे दौऱ्याच्या स्मृतींना उजाळा; लांडोर बंगला आजही बाबासाहेबांच्या विचारांचा प्रेरणास्थळ

सुनील निकम धुळे | प्रतिनिधी :
धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ल्याजवळील ऐतिहासिक लांडोर बंगल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या मुक्कामाला आज ८९ वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या भीम स्मृती यात्रेत राज्यासह मध्य प्रदेश व गुजरातमधून हजारो आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.

इतिहासानुसार, १९३७ मध्ये शिरपूर येथील न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या कामानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे आले होते. न्यायालयीन कामकाजानंतर त्यांनी धुळ्यातील संदेशभूमी येथे मार्गदर्शन केले आणि त्यानंतर लळिंग किल्ल्याजवळील लांडोर बंगल्यावर तीन दिवस मुक्काम केला. या मुक्कामामुळे लांडोर बंगला आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखला जातो.

दरवर्षी ३१ जुलै रोजी भीम स्मृती यात्रेच्या निमित्ताने हजारो अनुयायी प्रथम संदेशभूमी येथे अभिवादन करतात. त्यानंतर लांडोर बंगल्यावर बुद्धवंदना, अभिवादन आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही मोठ्या संख्येने नागरिकांनी या यात्रेत सहभाग नोंदवला.

लांडोर बंगला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची प्रेरणा देणारे स्मृतिस्थळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी राज्यभरातील अनुयायी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या श्रद्धेने येतात.

Share.
Leave A Reply

Exit mobile version