ऑपरेशन ‘घोरपड’ यशस्वी; शस्त्र चोरीप्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघांना आयुध निर्माणी वरणगाव सुरक्षा विभागाने पकडले
प्रतिबंधित क्षेत्रात संशयास्पद हालचाल करताना सापळा रचून कारवाई; शासकीय गुपिते अधिनियमांतर्गत गुन्हा, न्यायालयीन कोठडी
संघरत्न सपकाळे भुसावळ | प्रतिनिधी :
भारतीय शस्त्रनिर्मिती क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आयुध निर्माणी वरणगावच्या प्रतिबंधित परिसरात संशयास्पदरीत्या वावर करणाऱ्या शस्त्र चोरीप्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघांना सुरक्षा विभागाने ‘ऑपरेशन घोरपड’ अंतर्गत सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईनंतर वरणगाव पोलीस ठाण्यात शासकीय गुपिते अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी दुपारी आयुध निर्माणीच्या प्रतिबंधित परिसरालगत संशयास्पद हालचाली करणारे निलेश बळीराम थाटे आणि राजेंद्र श्रीधर कोळी (दोघे रा. तळवेल, ता. भुसावळ) हे सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आले. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल इसाक नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत संशयितांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळून आल्याने त्यांचा हेतू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, निलेश थाटे हा २३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयुध निर्माणीतील शस्त्रचोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याच्याविरोधातील तपास यापूर्वी दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि स्थानिक पोलिसांनी केला होता.
सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली. डीएससी जवान, खासगी सुरक्षा रक्षक, क्यूआरटी पथक आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे संशयितांना पकडले.
या प्रकरणी आयुध निर्माणीचे कनिष्ठ कार्यप्रबंधक अभिजित नंदी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात शासकीय गुपिते अधिनियम १९२३ तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक एम. झेड. सरवर आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी ले. कर्नल इसाक नदाफ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ सुरक्षा विभागाशी संपर्क साधावा.
