Spread the love

जळगाव शहरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

१.४७ लाखांचा दंड; ८२ हजारांची जागेवर वसुली, ११९ ई-चलन जारी

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील महाविद्यालय परिसरात वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने विशेष तपासणी मोहीम राबवत अल्पवयीन वाहनचालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून वाहतूक नियमांबाबत समुपदेशन करण्यात आले.

विशेष तपासणीदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी ८२ हजार रुपयांची वसुली घटनास्थळीच करण्यात आली, तर ११९ वाहनचालकांविरुद्ध ई-चलन जारी करण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे हे त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन देताना कायदेशीर जबाबदारीची जाणीव ठेवावी.

ही कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली केली. शहरात वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version