घोडसगाव-चिखली परिसरात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुषांसह १० महिलांवर कारवाई
हॉटेलच्या मागील परिसर व शेतात कथित अश्लील कृत्ये; मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा, संघटित रॅकेटचा तपास सुरू
जळगाव | प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली गावांच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या काही हॉटेलच्या मागील परिसरात तसेच शेतात पुरुष व महिला कथित अश्लील कृत्ये करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत १३ पुरुष आणि १० महिलांना ताब्यात घेतले. संबंधितांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ११० व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने संबंधित परिसरात छापा टाकला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी कथित अश्लील कृत्ये करत असल्याच्या आरोपावरून एकूण २३ जणांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत कारवाईतील सर्व महिला राजस्थान राज्यातील असल्याचे समोर आले आहे.
PITA कायद्यान्वये कारवाई नाही
या प्रकरणात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, १९५६ (PITA) अंतर्गत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्राथमिक तपासात मानवी तस्करी, जबरदस्ती, कुंटणखाना चालविणे किंवा वेश्याव्यवसायासाठी व्यक्तींचा वापर केल्याचे पुरावे समोर आले नसल्याने, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
संघटित रॅकेटचा शोध
संबंधित व्यक्ती तेथे कोणत्या कारणासाठी एकत्र आल्या होत्या, तसेच या प्रकारामागे कोणते संघटित रॅकेट किंवा अन्य बेकायदेशीर कारवाया आहेत का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपासादरम्यान नवीन माहिती समोर आल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
