Spread the love

के.टी. वेअर परिसरात पाण्याची अचानक वाढ; शाळेत अडकलेल्या शिक्षकांना गच्चीवरून सुखरूप बाहेर काढले, ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

भडगाव | गणेश रावळ । तालुका प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील नालबंदी येथे शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने गावाजवळील के.टी. वेअर (K.T. Weir) आणि नाल्यांमधील पाणी वेगाने वाढून शाळेच्या परिसरात शिरले. या घटनेत शाळेत उपस्थित असलेले शिक्षक इम्तियाज खान पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र, ग्रामस्थांच्या धाडसी आणि प्रसंगावधान राखणाऱ्या बचावकारवाईमुळे त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज खान हे नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत पोहोचून अध्यापनाच्या तयारीत असताना काही क्षणांतच पुराचे पाणी शाळेत घुसले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, शाळेबाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शाळेच्या गच्चीवर आश्रय घेतला.

या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता स्थानिक नागरिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य हाती घेत शिक्षक इम्तियाज खान यांना गच्चीवरून सुखरूप खाली आणले. या वेळी मोठा अनर्थ टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या बचाव मोहिमेत मा. सरपंच शेख रफियोद्दीन शेख मुनीर, भगवान निकुम, समीर शेख, माजहर शेख, प्रकाश ठाकरे तसेच पोलिस पाटील सुदाम मोरसिंग यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

अचानक आलेल्या पुरामुळे काही काळ नालबंदी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुराच्या पाण्यामुळे गावातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे के.टी. वेअर व नाल्यांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची, पूरस्थितीचा इशारा देणारी यंत्रणा उभारण्याची आणि पावसाळ्यात विशेष सतर्कता ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version