Spread the love

मुसळधार पावसामुळे पुलाखाली पाण्याचा वेग वाढला; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

शैलेश गुरव | जळगाव ग्रामीण प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील धानोरा ते मोहाडी दरम्यान असलेल्या रेल्वे पुलाखाली मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पुराचा प्रवाह सुरू झाला आहे. पुलाखालून पाण्याचा वेग वाढल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला असून त्याचा परिणाम रेल्वे पुलाखालील रस्त्यावर झाला आहे. पाण्याचा लोट वाढल्याने दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाच्या प्रत्येक मोठ्या सरीत या ठिकाणी पाणी साचत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे कामानिमित्त, शिक्षणासाठी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच पाणी ओसरत नाही तोपर्यंत या मार्गावर सतर्कता बाळगावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी कोणताही धोका पत्करून पुलाखालून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version