फाशीफुल चौकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण; जयघोषांनी परिसर दुमदुमला, महापुरुषांना अभिवादन करत शहरातून भव्य रॅली
धुळे | प्रतिनिधी :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील फाशीफुल चौक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना अर्पण केली.
कार्यक्रमादरम्यान “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो” तसेच “भगवान वीर एकलव्य की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाच्या विचारांना उजाळा दिला.
यानंतर तरुणांच्या सहभागातून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. फाशीफुल चौकातून सुरू झालेली ही रॅली बसस्थानक मार्गे आंबेडकर पुतळा, जेल रोड, आग्रा रोड परिसरातून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुन्हा फाशीफुल चौकात येऊन संपन्न झाली.
रॅलीदरम्यान विविध महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले. यावेळी ॲड. संतोष जाधव, वाल्मीक जाधव, कपिल चांदणे, शेरा पठाडे, देवा कढरे, प्रशांत थोरात, किशोर मोरे, किशोर बोरसे, राजू चव्हाण, संदीप जाधव, ॲड. विशाल साळवे, ॲड. शुभम मतकर, ॲड. पवन सूर्यवंशी, ॲड. निलेश सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
