Spread the love

पारोळा एरंडोलचे आमदार अमोल पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुरग्रस्त भागाची केली पाहणी

पारोळा/ सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)

पारोळा तालुक्यात आणि जिल्हयात सुरू झालेल्या अति मुसळधार पावसाने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या हिरव्यागार शिवारांवर आज पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. काबाड कष्टाने उभी केलेली पिके, संसारोपयोगी साहित्य, पशुधन आणि अनेकांचे आयुष्यभराचे कष्ट क्षणात वाहून गेल्याचे अत्यंत वेदनादायी चित्र पारोळा तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या समवेत पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.उ., देवगाव, टोळी, तरडी आणि उंदीरखेडे या पूरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. प्रत्येक गावात पाण्याने केलेला विध्वंस पाहून मन सुन्न झाले. अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत असहाय्यतेचे अश्रू होते, तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची वेदना स्पष्ट दिसत होती. अशी वेळ कोणावरही येऊ नये, अशीच भावना प्रत्येक क्षणी मनात दाटून आली.

या पावसामुळे टिटवी येथे सुद्धा पाचपांडव मंदिराजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे गावातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सौर ऊर्जेचे पूर्ण संच जमिनदोस झालेले आहे. या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रशासनाला तातडीने मदतकार्य अधिक गतिमान करण्याच्या, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या आणि अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, पशुधनासाठी आवश्यक व्यवस्था आणि पंचनाम्यांची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार अमोल पाटील यांच्याकडून देण्यात आल्या, पूरग्रस्तांना शासनाच्या सर्व मदतीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे असे हि त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

सध्याच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले, पूल आणि पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वप्रथम जपावी, असे नम्र आवाहन शासनामार्फत केले जात आहे.

या कठीण प्रसंगी आमदार अमोल पाटील हे स्वतः संपूर्ण प्रशासनाच्या संपर्कात असून पूरग्रस्त बांधवांच्या प्रत्येक अडचणीत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकमेकांना आधार देत, संयम आणि धैर्याने या नैसर्गिक आपत्तीवर निश्चितच मात करू. या पूरग्रस्त कुटुंबांच्या भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि.प. कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, गटविकास अधिकारी डॉ. भुषण कदम, पोलीस निरीक्षक दिपक पवार, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, समीर पाटील, आधार पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, एकनाथ पाटील संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version