Spread the love

भोलाणे येथे घरात शिरणारे पाणी अडविताना घडली दुर्घटना; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)

पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेत ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घरात शिरणारे पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न करत असताना कच्च्या भिंतीचे दगड अंगावर कोसळल्याने गंभीर दुखापत होऊन प्रकाश अर्जुन करंजे (वय ६५) यांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी (दि. ३१) सकाळपासूनच परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. घराच्या पाठीमागील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने पाणी थेट करंजे यांच्या घरात शिरू लागले. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घरात अधिक पाणी येऊ नये म्हणून ते घराजवळ अडकलेली घाण बाजूला करत होते. याचवेळी कच्च्या पायावरील भिंतीचे दगड अचानक कोसळून त्यांच्या अंगावर पडले. दगडांचा जोरदार फटका बसल्याने त्यांचा तोल गेला आणि ते दगडांवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती कांतीलाल करंजे यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार कैलास साळुंखे पुढील तपास करीत आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध भागांत नुकसान होत असताना या दुर्दैवी घटनेमुळे भोलाणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version