पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनासह मैदानात आमदार ॲड. अमोल पाटील; बाधित गावांची केली पाहणी
मुंदाणे, देवगाव, टोळी, तरडी, उंदीरखेडेसह टिटवी परिसराची पाहणी; पंचनामे, मदतकार्य व सुरक्षिततेबाबत प्रशासनाला तातडीच्या सूचना
पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुक्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पार्श्वभूमीवर पारोळा-एरंडोलचे आमदार ॲड. अमोल पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासमवेत पूरग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर देत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे.
आमदार अमोल पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या समवेत मुंदाणे (प्र.उ.), देवगाव, टोळी, तरडी आणि उंदीरखेडे या पूरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. अनेक कुटुंबांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी प्रशासनाला मदतकार्य अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, टिटवी येथील पाचपांडव मंदिराजवळील धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे अनेक शेतांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांचे संचही पाण्याखाली जाऊन नुकसान झाल्याची माहिती यावेळी समोर आली.
परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार अमोल पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे, बाधित नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे, अन्न, पिण्याचे पाणी, औषधे तसेच पशुधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. शासनाकडून मिळणाऱ्या सर्व मदतीचा लाभ पात्र नागरिकांना वेळेत मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले व पुलांवर जाणे टाळावे तसेच स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता जपावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, गटविकास अधिकारी डॉ. भूषण कदम, पोलीस निरीक्षक दीपक पवार, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, समीर पाटील, आधार पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, एकनाथ पाटील, संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
