Spread the love

पारोळ्याच्या वाढीव वस्त्यांनाही शुद्ध पाण्याची हमी; नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ

₹६३.७० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन, प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाणी पोहोचविण्याचा संकल्प

पारोळा | प्रतिनिधी : संदीप पाटील

पारोळा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहिलेल्या वाढीव वस्त्यांमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुरक्षित आणि शुद्ध पाणी पोहोचविण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

पारोळा शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ₹६३.७० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे ८० ते ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही अंतिम टप्प्यात आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे. मात्र, शहराच्या हद्दीचा विस्तार झाल्यामुळे काही नव्याने विकसित झालेल्या वस्त्या या योजनेच्या कक्षेबाहेर राहिल्या होत्या.

या भागातील नागरिकांनी वारंवार केलेल्या मागणीची दखल घेत प्रशासनाने वाढीव वस्त्यांपर्यंत पाणीपुरवठा पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. या कामाच्या शुभारंभामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकल्पामुळे भविष्यात शहरातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित व शुद्ध पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य होणार असून, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. शहरातील कोणताही भाग पाणीपुरवठ्यापासून वंचित राहू नये, हा या योजनेचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीष पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे, नगरसेवक नितीन सोनार, राजाराम पाटील, राजाबापू पाटील, छोटूभाऊ पाटील, विवेक पाटील, नझीरखान बेलदार, दीपक अनुष्ठान, अमोल शिरोळे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर पारोळा शहरातील वाढीव वस्त्यांतील नागरिकांनाही इतर भागांप्रमाणे नियमित, सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version