शिवसेनेतर्फे यंदाही दिल्लीत ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत भव्य रक्तदान शिबिर; देशाच्या जवानांप्रती कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे यंदाही नवी दिल्ली येथे ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा विशेष रक्तदान उपक्रम राबविण्यात येणार असून, यात १,२०० हून अधिक शिवसैनिक सहभागी होऊन रक्तदान करणार आहेत.
ही महारक्तदान यात्रा ९ ऑगस्ट २०२६ रोजी आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासणाऱ्या या उपक्रमात राज्यासह विविध भागांतील शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
शिवसेनेकडून सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिराचा उद्देश केवळ रक्तसंकलन करणे नसून, देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे हाही आहे.
रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असल्याचा संदेश देत शिवसेनेने या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे. रक्तदान शिबिरात १,२०० हून अधिक शिवसैनिक सहभागी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
