तरसोद बोगद्यावरील पाणी साचण्याच्या समस्येवर खासदार स्मिता वाघ यांचा दणका; अधिकाऱ्यांना खडे बोल
५ ते ६ दिवसांत पाणी निचऱ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश; उंटबीडी रिक्षा स्टॉपजवळील खराब रस्त्याचाही प्रश्न ऐरणीवर
नशिराबाद | प्रतिनिधी
तरसोद बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या गंभीर समस्येची जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी करून दखल घेतली. घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देत पाच ते सहा दिवसांत पाणी निचऱ्याचे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पाहणीदरम्यान संबंधित वरिष्ठ अधिकारी साळुंके यांनी अतिक्रमणामुळे पाणी निचऱ्याचे काम रखडल्याचे कारण सांगितले. मात्र, या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त करत खासदार वाघ यांनी कोणतेही कारण पुढे न करता निश्चित मुदतीत काम पूर्ण करण्याचा आदेश दिला. दरवर्षी याच समस्येमुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत यापुढे कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी तरसोद बोगद्याच्या पुढे उंटबीडी रिक्षा स्टॉपजवळील अरुंद आणि खचलेल्या रस्त्याच्या समस्येकडे खासदारांचे लक्ष वेधले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बस गावात येण्यास टाळाटाळ करत असून विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नाचीही तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन खासदार वाघ यांनी दिले.
पाहणी दौऱ्यावेळी नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील, सभापती कीर्तिकांत चौबे, मनोज पाटील, नगरसेवक बापू बोढरे, सचिन महाजन तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पाणी निचऱ्याच्या कामात अतिक्रमण किंवा अन्य कोणतीही स्थानिक अडचण येऊ दिली जाणार नाही आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी यावेळी दिली.
खासदार स्मिता वाघ यांच्या कडक भूमिकेमुळे तरसोद बोगद्यावरील पाणी साचण्याचा प्रश्न, महालक्ष्मी मंदिराजवळील चौफुलीवरील प्रकाशव्यवस्थेची समस्या तसेच उंटबीडी रिक्षा स्टॉप परिसरातील रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
