जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम ‘उमेद – उद्याची पहाट २०२६’; बालविधी संघर्षग्रस्त मुलांना नवजीवनाची दिशा
न्यायव्यवस्था, पोलीस व सामाजिक संस्थांच्या संयुक्त पुढाकारातून आत्मविश्वास, शिक्षण आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा
जळगाव | प्रतिनिधी
विधी संघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून त्यांना नव्या आयुष्याची दिशा देण्याच्या उद्देशाने जळगाव पोलिसांच्या पुढाकारातून ‘उमेद – उद्याची पहाट २०२६’ हा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. जोशी आणि जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले.
निरीक्षण गृह, आधार बहुउद्देशीय संस्था आणि केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विधी संघर्षग्रस्त बालकांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार, शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक प्रेरणा देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान मुलांशी मुक्त संवाद साधण्यात आला. गप्पा-गोष्टी, प्रश्नोत्तरे, खेळ, प्रेरणादायी उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून मुलांमध्ये सकारात्मक विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करून त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, अमित माळी, संघपाल तायडे, निरीक्षण गृहचे रवीकिरण अहिरराव, दिगंबर पाटील, राहुल भालेराव, प्रशांत तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात महिला व बालक सहाय्य कक्ष, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प, आधार बहुउद्देशीय संस्था यांचे प्रतिनिधी विद्या सोनार, आनंद पगारे, भाग्यश्री, मोहिनी धनगर, सुनील जगन हिवाळे तसेच स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
‘उमेद – उद्याची पहाट २०२६’ या उपक्रमामुळे विधी संघर्षग्रस्त बालकांच्या मनात आत्मविश्वास जागवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
