रानकवी ना. धों. महानोर यांच्या कवितेने मराठी साहित्य निसर्ग सौंदर्याने अधिक समृद्ध केले – प्रा. डॉ. जतीन मेढे
महानोरांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शब्द फुलांची आदरांजली’ कार्यक्रम; साहित्य, कविता आणि चित्रपट गीतांच्या योगदानाला अभिवादन
भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे)
रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या कवितेने मराठी साहित्याला निसर्ग सौंदर्याची अनमोल देणगी दिली असून, बालकवी आणि निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या समृद्ध साहित्य परंपरेला महानोरांनी आपल्या लेखणीतून अधिक वैभव प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले.
महाविद्यालयातील मराठी विभाग आणि निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा गणबोली भाषा अभ्यास व संवर्धन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘शब्द फुलांची आदरांजली’ या विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अजय कोल्हे होते.
यावेळी महानोर यांच्या साहित्यावर भाष्य करताना प्रा. डॉ. मेढे म्हणाले की, “खानदेशच्या भूमीने केवळ केळी, कपाशी आणि उसाचे मळेच नव्हे, तर साहित्याचेही वैभव फुलवले आहे. बालकवी आणि बहिणाबाई यांच्या निसर्गपरंपरेला महानोरांनी आपल्या कविता, कथा आणि कादंबऱ्यांमधून नवे आयाम दिले. शेतशिवार, माती, माणसं आणि मानवी भावविश्वाचे त्यांनी केलेले चित्रण मराठी साहित्याची अमूल्य संपत्ती आहे.”
ते पुढे म्हणाले की, “निसर्ग हा सौंदर्याचा अखंड खजिना आहे. महानोरांच्या साहित्यामुळे वाचकाला निसर्गाशी नवे नाते जोडण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या कवितांमधील मातीचा गंध, ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि भावनांची समृद्ध अभिव्यक्ती अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”
अध्यक्षीय समारोपात डॉ. अजय कोल्हे यांनी महानोरांच्या साहित्यिक आणि गीतकार म्हणून केलेल्या योगदानाचा गौरव केला. “महानोरांनी मराठी चित्रपटांना दिलेली गीते आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या शब्दांतील अर्थ, संवेदना आणि निसर्गाशी असलेले नाते मराठी साहित्याला चिरंतन ठेवा देणारे आहे. त्यांच्या कविता आणि साहित्याने अनेक पिढ्यांच्या भावविश्वाला समृद्ध केले,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी केले.
