Spread the love

राज्यातील पारंपरिक विणकरांना मोठा दिलासा; गणेशोत्सवानिमित्त उत्सव भत्त्याचा शासन निर्णय जारी

महिला विणकरांना १५ हजार, पुरुष विणकरांना १० हजार रुपये; १.२५ कोटींपेक्षा अधिक निधीस मंजुरी

यावल | प्रतिनिधी (हर्षल पाटील)

राज्य शासनाने पारंपरिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत विणकरांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना उत्सव भत्ता मंजूर करण्यात आला असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो हातमाग कारागिरांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

शासनाने या योजनेसाठी १ कोटी २५ लाख ९७ हजार रुपये इतका निधी मंजूर केला असून, तो वितरित करण्यासही मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील पैठणी साडी, हिमिरु शाल, करवत काठी साडी, घोंगडी आणि खण फॅब्रिक या पाच पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत नोंदणीकृत विणकरांना मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार पात्र महिला विणकरांना १५ हजार रुपये, तर पुरुष विणकरांना १० हजार रुपये उत्सव भत्ता देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर मिळणाऱ्या या आर्थिक सहाय्यामुळे विणकरांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून, पारंपरिक हातमाग उद्योगाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पारंपरिक वस्त्रोद्योग हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. बदलत्या काळात यांत्रिकीकरण आणि बाजारपेठेतील स्पर्धेमुळे अनेक पारंपरिक विणकर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या जीवनमानाला आधार देणारा ठरणार असल्याचे मत वस्त्रोद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

विशेषतः पैठणी, हिमिरु शाल, घोंगडी आणि खण यांसारख्या पारंपरिक उत्पादनांची ओळख जपणाऱ्या कारागिरांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळेल. तसेच पारंपरिक कला आणि हातमाग उद्योग टिकवून ठेवण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मिळणाऱ्या या उत्सव भत्त्यामुळे राज्यातील विणकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, हा निर्णय त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version