भडगाव तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्या; पंचनामे व विशेष मदतीची मागणी
युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन; कापूस, मका, सोयाबीन पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाल्याचा दावा
भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ
भडगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी तसेच खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या पुनर्स्थापनेसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी भडगाव युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त भागाची शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पूराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तालुक्यातील अनेक शेतांमधील उभी पिके उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले. कापूस, मका, सोयाबीन यांसारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सुपीक माती वाहून गेल्याने शेतजमिनी संकटात
पूराच्या पाण्यासोबत शेतातील सुपीक मातीचा थर वाहून गेला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ व वाळू साचली आहे. त्यामुळे काही शेतजमिनी तात्पुरत्या नापीक झाल्या आहेत. याशिवाय शेतबांध, ठिबक सिंचन संच, पाईपलाईन आणि शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला खर्च, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा खर्च वाया गेल्याने त्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संयुक्त पथकाद्वारे पंचनाम्याची मागणी
निवेदनात तलाठी, कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार करून बाधित गावांमधील शेतीपिके व शेतजमिनींचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान (Input Subsidy) मंजूर करून मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात खरडून गेलेल्या जमिनींसाठी शासनाने हेक्टरी विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते. त्याच धर्तीवर भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेजची शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
रब्बी हंगामापूर्वी जमीन पूर्ववत करण्याची मागणी
शेतात साचलेला गाळ व वाळू काढून जमीन पुन्हा शेतीयोग्य करण्यासाठी रब्बी हंगामापूर्वी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी विनंती करण्यात आली.
या निवेदनाची प्रत जळगाव जिल्हाधिकारी आणि भडगाव तालुका कृषी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
पदाधिकारी व शेतकरी उपस्थित
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशुतोष प्रदीपराव पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय बळीराम पाटील, मनोहर महाले (अध्यक्ष, युवक काँग्रेस विधानसभा पाचोरा-भडगाव), अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस याकूब खान पठाण, युवक शहराध्यक्ष गोविंद देशमुख, युवक काँग्रेस सरचिटणीस अर्जुन प्रकाश शिंदे, तालुका उपाध्यक्ष विनोद नेरपगार, बेगकलीम बेग, तोफिक मणियार, विलास देशमुख यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
