महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संघटन सरचिटणीसपदी किशोर रायसाकडा; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
संघटनात्मक कार्याची दखल; प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती जाहीर
पाचोरा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या संघटन सरचिटणीस पदावर ज्येष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेवरून प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे दीर्घकाळचे योगदान, संघटनात्मक कार्यातील सक्रियता आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
किशोर रायसाकडा यांनी यापूर्वी संघटनेत खान्देश विभागीय अध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. या काळात त्यांनी पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत संघटनेला अधिक सक्षम आणि प्रभावी बनविण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटनात्मक कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, किशोर रायसाकडा यांच्या संघटन सरचिटणीसपदी झालेल्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
