जळगावातील ‘बाबा नमकीन’ कारखान्यात भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
एमआयडीसीतील कारखान्यात शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात, मोठ्या प्रमाणात खाद्यसाहित्याचे नुकसान
भाऊ सपकाळे जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील प्रसिद्ध ‘बाबा नमकीन चिवडा’ कंपनीत मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण इमारतीला वेढा घातला. मात्र, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आग आटोक्यात आणल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास कारखान्यातून धुराचे मोठे लोट बाहेर येताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही वेळातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला तातडीने कळविण्यात आले.
माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन उपकेंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाच अग्निशमन बंबांच्या सहाय्याने जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत आग नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे आग शेजारील उद्योगांमध्ये पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत कारखान्यातील मोठ्या प्रमाणावरील नमकीन व खाद्यसाहित्याचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून, आर्थिक नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. संबंधित यंत्रणांकडून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.
या बचावकार्यात वाहनचालक युसूफ पटेल, मयूर ओतारी आणि शोएब तडवी यांनी अग्निशमन वाहने वेळेत घटनास्थळी पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच फायरमन योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, इक्बाल तडवी, राकेश पाटील, विक्की सोनवणे आणि सतार तडवी यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कारखान्याच्या परिसरातील इतर उद्योग आणि मालमत्तेचे संभाव्य मोठे नुकसान टळल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानाचा तपशील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
