आरटीओच्या वाहन तपासणीदरम्यान भीषण अपघात? ट्रॉलाने चार-पाच वाहनांना चिरडले; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
चाळीसगाव चौफुलीवरील थरार सीसीटीव्हीत कैद; आरटीओ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी
धुळे | प्रतिनिधी
धुळे–चाळीसगाव महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रॉलाने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओ अधिकाऱ्यांनी महामार्गावर एका अवजड ट्रॉला वाहनाला तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही क्षणांतच भरधाव ट्रॉलाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात मालेगाव येथील पिकअप चालक सोमनाथ बाबुलाल चव्हाण (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. ते बियाण्यांची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नाशिक येथील विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेत पिकअप, कारसह अन्य वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, अपघातातून बचावलेल्या काही प्रवाशांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी आरटीओ अधिकाऱ्यांनी अवजड वाहन अडविण्याची पद्धत चुकीची होती, असा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अचानक वाहन थांबविण्याचा प्रयत्न झाल्याने ट्रॉला चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुढील वाहनांना धडक बसली. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
