Spread the love

प्रलंबित जात प्रमाणपत्रे तातडीने द्या; सकल आदिवासी कोळी समाजाचे भुसावळ प्रांत कार्यालयावर निवेदन

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापूर्वी सर्व पात्र प्रकरणे निकाली काढण्याचे तहसीलदारांचे आश्वासन; पूर्ण कागदपत्रे असलेल्या अर्जांना प्राधान्य

भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे)

जात प्रमाणपत्रासाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, या मागणीसाठी सकल आदिवासी कोळी समाजाच्या वतीने मंगळवारी (४ ऑगस्ट) भुसावळ प्रांत कार्यालयात तहसीलदार विनते यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दोन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण असलेल्या अर्जांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापूर्वी प्रांत कार्यालयाकडे प्रलंबित असलेली सर्व पात्र जात प्रमाणपत्रांची प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी केली. यावर तहसीलदार विनते यांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण असलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा ९ ऑगस्टपर्यंत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

यावेळी तहसीलदारांनी ३ ऑगस्ट रोजी सुमारे २५ ते ३० जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याची माहितीही दिली. उर्वरित पात्र अर्जांवरही वेगाने कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकल आदिवासी कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी जात प्रमाणपत्रासाठी सुरू असलेला संघर्ष पुढेही कायम राहणार असून, पात्र लाभार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका मांडली.

या प्रसंगी स्वराज्य कोळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सकल आदिवासी कोळी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version