यावल पोलिसांची मोहराळे गावात धडक कारवाई; अवैध दारू विक्री व हातभट्ट्यांवर छापे
तीन ठिकाणी कारवाई करत दारूचा साठा जप्त; अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई; हातभट्टी दारूसह देशी दारूच्या बाटल्या हस्तगत
यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील
यावल पोलिसांनी मोहराळे गावात अवैध दारू विक्री आणि निर्मितीविरोधात धडक कारवाई करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी हातभट्टी दारूसह देशी दारूचा मोठा साठा जप्त केला असून, अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मोहराळे गावात अवैध दारू निर्मिती व विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत गावातील तीन ठिकाणी छापे टाकले.
या कारवाईत शकील तडवी याच्याकडून १५ लिटर गावरान हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. तसेच शालिग्राम अळकमोल याच्याकडून ९० मिली क्षमतेच्या सुमारे २१ दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. तर तिसऱ्या कारवाईत समाधान अडकमोल याच्याकडूनही ९० मिली क्षमतेच्या सुमारे २१ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
यावल पोलिसांच्या या कारवाईमुळे मोहराळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
