ईशानच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; कोळी परिवाराचा अनुकरणीय सामाजिक उपक्रम
महात्मा फुले हायस्कूलमध्ये चित्रकला साहित्य, पेन, कंपास पेटी व मिठाईचे वितरण; मुख्याध्यापक जे. एस. पवार यांचे शिक्षकांना सामाजिक उपक्रमांचे आवाहन
धरणगाव | प्रतिनिधी
वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीही असते, याचा आदर्श धरणगाव येथील कोळी परिवाराने घालून दिला. शहरातील सुवर्ण महोत्सवी महात्मा फुले हायस्कूल येथील उपशिक्षक सुनील नारायण कोळी यांच्या सुपुत्र चि. ईशान यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
शाळेत आयोजित कार्यक्रमात चित्रकला वही, रंगपेटी, कलर पेन्सिल बॉक्स, पेन, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. डी. पाटील यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी कोळी परिवाराच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. “वाढदिवस मोठ्या खर्चात साजरा करण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. प्रत्येक शिक्षकाने आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्यास अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल,” असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक प्रेरणा निर्माण झाली असून, सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणाला समाजोपयोगी कार्याची जोड दिल्यास समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिठाईचेही वाटप करण्यात आले. यामुळे शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोळी परिवाराच्या या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळी आणि प्रेरणादायी परंपरा समाजासमोर आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर एच. डी. माळी यांनी आभार मानले.
