Spread the love

जळगाव–शेळगाव मार्गावरील ‘खारी दाब’ पूल खचला; मोठ्या अपघाताची भीती

पावसामुळे पुलाचे नुकसान; पाण्याचा निचरा विस्कळीत, शेतकऱ्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

जळगाव | प्रतिनिधी

असोदा बायपासनंतर जळगाव–शेळगाव मार्गावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ, हॉटेल साई बाबा परिसरातील ‘खारी दाब’ पूल मुसळधार पावसामुळे एका बाजूने खचल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुलालगत मोठी दरड निर्माण झाल्याने कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून, असोदा परिसरातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक क्षमतेचे पाइप न टाकता नाली दाबण्यात आली आहे. परिणामी, पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचून पुलावरून वाहत ‘खारी दाब’मध्ये जात आहे. सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या एका बाजूचा भाग खचला असून रस्त्याच्या कडेला मोठी दरड निर्माण झाली आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच शेतकऱ्यांची ये-जा होत असते. दरड रस्त्यालगतच निर्माण झाल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात वाहन घसरून खोल भागात जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात रस्ता खचण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र काही महिन्यांतच पुन्हा तीच समस्या निर्माण झाल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर असोदा येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. बंद झालेली नाली तातडीने मोकळी करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, खचलेल्या पुलाची त्वरित दुरुस्ती करून मजबूत संरक्षण कठडे उभारावेत तसेच वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी इशारा फलक व अन्य सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version