Spread the love

पाळधी–तरसोददरम्यान महामार्ग खचल्याने वाहतूक ठप्प; टोल वसुलीवर वाहनचालकांचा संताप

पर्यायी मार्गामुळे वेळ व इंधनाचा वाढला खर्च; रस्ता पूर्ववत होईपर्यंत टोल वसुली बंद करण्याची मागणी

जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी बायपास ते तरसोद फाटा दरम्यान काही दिवसांपूर्वी रस्त्याचा एक भाग अचानक खचल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून वेळ आणि इंधनाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

रस्ता बंद असतानाही संबंधित टोल नाक्यावर नियमितपणे टोल वसुली सुरू असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहनधारकांनी “रस्ता उपलब्ध नाही, मग टोल कशासाठी?” असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रस्ता खचल्यामुळे जळगाव–धुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढण्याबरोबरच इंधन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत संबंधित टोल नाक्यावर टोल वसुली तात्काळ स्थगित करावी किंवा याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

एका संतप्त वाहनचालकाने प्रतिक्रिया देताना सांगितले, “पाळधी–तरसोद दरम्यान रस्ता खचल्यामुळे आधीच आमचा प्रवास लांबला आहे. सुविधा नसतानाही टोल आकारला जात आहे. रस्ता पूर्णपणे सुरू होईपर्यंत टोल वसुली बंद ठेवावी.”

रस्ता दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version