Spread the love

क्रांतीदिनी प्रागतिक विचार मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ

दहावी-बारावीतील गुणवंतांसह लोकसेवा-राज्यसेवा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचाही होणार सन्मान

भुसावळ | प्रतिनिधी (संघरत्न सपकाळे)

क्रांतीदिनाचे औचित्य साधून प्रागतिक विचार मंचाच्या वतीने भुसावळ शहर व तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रत्येक शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समारंभ रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रागतिक विचार मंचाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जे. पी. सपकाळे हे राहणार आहेत.

समारंभास वरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, प्रागतिक चळवळींचे अभ्यासक प्रा. डॉ. जतीन मेढे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजेश मानवतकर, जळगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे तसेच भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यशवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचाही होणार गौरव

या कार्यक्रमात लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या भुसावळ तालुक्यातील यशवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच भुसावळ आणि वरणगाव नगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्गातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही प्रागतिक विचार मंचाच्या वतीने गौरव केला जाणार आहे.

विद्यार्थी-पालकांना उपस्थितीचे आवाहन

गुणवंत विद्यार्थ्यांची नोंदणी कार्यक्रमस्थळी दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत करण्यात येणार असून विद्यार्थी व पालकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रागतिक विचार मंचाचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघरत्न सपकाळे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version