धरणगावात शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन; प्रलंबित अनुदान तातडीने जमा करण्याची मागणी
तीन महिन्यांपासून सामाजिक सुरक्षा योजनांची ऑनलाइन सेवा ठप्प; लाभार्थ्यांचे हाल, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा – गुलाबराव वाघ
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, दिव्यांग, अपंग, परित्यक्ता आदी सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. ऑनलाइन सेवा तातडीने पूर्ववत सुरू करून प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित योजनांची ऑनलाइन प्रणाली तीन महिन्यांपासून बंद असल्याने अर्जांची स्थिती, मानधन जमा झाल्याची माहिती अथवा योजना सुरू आहे की बंद, याबाबत लाभार्थ्यांना कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे गरीब, निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि परित्यक्ता महिलांना वारंवार सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यावेळी गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून ऑनलाइन सेवा पूर्ववत सुरू करावी तसेच सर्व प्रलंबित मानधन तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेविका हेमांगी अग्निहोत्री, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
