Spread the love

चोपड्यात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य आयोजन

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पुढाकाराने जल्लोषात मिरवणूक; आदिवासी बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

चोपडा | प्रतिनिधी (राहुल पाटील)

चोपडा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताबाई सोनवणे यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा सोहळा अधिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून तालुकाभरातून आदिवासी बांधव, शिवसैनिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती, चोपडा येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. विविध बँड पथके, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर मिरवणूक पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात समारोप होईल.

या कार्यक्रमाला जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे व डॉ. गौरव सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे विविध सांस्कृतिक पथके, पारंपरिक नृत्य आणि बँड पथकांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा तालुक्याला नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून चोपडा तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version