धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल
स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत ₹१२.४९ कोटींच्या मलनिस्सारण योजनेला गती; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
धरणगाव / मुंबई | प्रतिनिधी
धरणगाव शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत प्रस्तावित मलनिस्सारण प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. नगर विकास विभागाने राज्यभरातील वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्याने धरणगावच्या प्रकल्पालाही गती मिळाली आहे. या यशाचे श्रेय जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिले जात आहे.
धरणगाव नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत सादर केलेल्या मलनिस्सारण योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, नाशिक यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये ६ एमएलडी क्षमतेचे आधुनिक MMBR तंत्रज्ञानाधारित मलजल प्रक्रिया केंद्र (STP), मलजल वाहिनी जाळे तसेच Interception & Diversion या घटकांचा समावेश असून प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹१२.४९ कोटी आहे.
शासनाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मलजल प्रक्रिया केंद्रे, मलजल वाहिनी जाळे, नाले अडवणे व वळवणे, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, गुणवत्ता नियंत्रण आणि संचालन व देखभाल यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तसेच बेसलाईन सर्वेक्षण, मृदा चाचणी, हायड्रॉलिक डिझाईन, विद्युत व यांत्रिक नियोजन, पुनर्वापर आराखडा आदी बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धरणगाव शहरातील उघड्या नाल्यांमधून वाहणारे दूषित पाणी, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि जलप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्याने, वृक्षसंवर्धन, रस्ते धुणे, बांधकामे तसेच इतर सार्वजनिक कामांसाठी करता येणार असल्याने नैसर्गिक जलस्रोतांवरील ताणही कमी होणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मत
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, “स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांचा परस्परांशी अतिशय जवळचा संबंध आहे. राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी तयार केलेली नवी कार्यपद्धती ही राज्यातील शहरांच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. धरणगावसह राज्यातील सर्व नागरी भागांमध्ये आधुनिक मलजल प्रक्रिया सुविधा उभारून सांडपाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, जलस्रोतांचे संरक्षण आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. धरणगावच्या या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, तो पूर्ण झाल्यानंतर शहराच्या स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापनात गुणात्मक बदल घडून येईल.”
