Spread the love

तरसोद–फागणे बायपासच्या निकृष्ट कामाविरोधात मनसे–ठाकरे सेना आक्रमक

उच्चस्तरीय चौकशी, ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट व फौजदारी कारवाईची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जगदिश सपकाळे जळगाव | प्रतिनिधी

तरसोद ते फागणे बायपास महामार्गावरील कथित निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. संबंधित कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट (Black List) करण्यासह संबंधितांविरुद्ध फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, तरसोद–फागणे बायपास महामार्ग हा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड व प्रवासी वाहनांची वाहतूक होते. तसेच या मार्गावर लोहमार्ग क्रॉसिंग असल्याने रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा अत्यंत महत्त्वाचा आहे.

मात्र, संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तांत्रिक निकष, गुणवत्तेची मानके आणि करारातील अटींचे पालन न झाल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या

  • महामार्गाच्या कामाची स्वतंत्र व निष्पक्ष उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी.

  • प्रयोगशाळेमार्फत रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी.

  • निकृष्ट काम सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा.

  • संबंधित ठेकेदाराचा शासनाच्या निविदा प्रक्रियेतून कायमस्वरूपी अथवा नियमानुसार ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करावा.

  • कामाची देखरेख करणाऱ्या अभियंते व अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावरही शिस्तभंग व फौजदारी कारवाई करावी.

निवेदनात प्रशासनाला इशाराही देण्यात आला आहे की, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन छेडले जाईल तसेच सक्षम न्यायालय आणि संबंधित वैधानिक प्राधिकरणांकडे दाद मागण्यात येईल.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडेललित शर्मा, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, उपतालुकाध्यक्ष शैलेश चौधरीराहुल चव्हाणसुनील सोनवणेप्रशांत बाविस्करकिरण सपकाळचेतन पाटील तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगेप्रमोद सोनवणेगणेश पाटीलप्रेमराज राठोडकिरण ठाकूरलोटन सोनवणेराजेंद्र पाटील यांच्यासह मनसे व ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version