शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग; दीड लाखांचे नुकसान
विसनजीनगरातील ‘मयुर ट्रेडर्स’मध्ये दुर्घटना; किराणा मालासह फर्निचर व इलेक्ट्रिक साहित्य जळाले
जगदिश सपकाळे जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील विसनजीनगर परिसरातील मे. मयुर ट्रेडर्स या किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत किराणा माल, फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे, काउंटर तसेच इतर साहित्य आगीत भस्मसात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुकानात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून, आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप पाटील करीत आहेत.
