Spread the love

कासारखेडा शिवारातून ८५ हजारांची वीज तार चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

महावितरणचे ३,९०७ मीटर ॲल्युमिनिअम कंडक्टर लांबवले; यावल पोलिसांकडून तपास सुरू

यावल | प्रतिनिधी

यावल तालुक्यातील कासारखेडा मोटकरी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीची सुमारे ३,९०७ मीटर लांबीची ॲल्युमिनिअम वीज तार चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे महावितरणचे सुमारे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ मनोहर बन्सीलाल सोनवणे (रा. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० ते ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान ही चोरी झाली.

चोरट्यांनी कासारखेडा ग्रुप-०४ (रोहित्र क्र. 0647635) आणि कासारखेडा ग्रुप-०१ (रोहित्र क्र. 0647632) अंतर्गत येणाऱ्या शेतशिवारातील एकूण २२ गाळ्यांमधील ॲल्युमिनिअम कंडक्टर चोरून नेला.

२२ गाळ्यांमधील तार चोरी

ग्रुप-०४ अंतर्गत ग्रामपंचायत कासारखेडा मोटकरी येथील गट क्रमांक ५५ पासून देविदास पंडित झांबरे (गट क्र. ५३) आणि युवराज चंद्रकांत चौधरी (गट क्र. ५७) यांच्या शेतापर्यंतच्या १२ गाळ्यांतील, तर ग्रुप-०१ अंतर्गत गट क्रमांक ५७ ते गट क्रमांक ५६ पर्यंतच्या १० गाळ्यांतील वीज तारा चोरट्यांनी लंपास केल्या.

महावितरणचे कर्मचारी हेमराज उमाकांत पाटील आणि हेमंत चंद्रशेखर पाटील यांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता, एकूण ३,९०७ मीटर लांबीची वीज तार गायब असल्याचे निदर्शनास आले.

भारतीय विद्युत अधिनियमांतर्गत गुन्हा

या प्रकरणी मनोहर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ च्या कलम १३६ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version