Spread the love

वाहन चालक-मालकांना कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्याचे आवाहन

धर्मवीर आनंद दिघे प्रवासी वाहतूक चालक-मालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

पारोळा | प्रतिनिधी : सुरेश पाटोळे

महाराष्ट्र शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक-मालक कल्याणकारी मंडळ’ अधिक व्यापक करत प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालक-मालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुधारित निर्णयानुसार आता केवळ ऑटो रिक्षा परवानाधारक वाहन मालकांपुरती मर्यादित असलेली योजना बस, टुरिस्ट टॅक्सी आणि ऑटो चालक-मालकांनाही लागू करण्यात आली आहे.

यापूर्वी या मंडळाचे सदस्यत्व फक्त ऑटो रिक्षा परवानाधारक वाहन मालकांनाच उपलब्ध होते. मात्र, शासनाच्या सुधारित निर्णयानुसार बस, टुरिस्ट टॅक्सी किंवा ऑटो प्रवासी वाहन चालविण्याचा वैध बॅज असलेले चालक-मालक आता या मंडळाचे सभासद होण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

मंडळामार्फत चालक-मालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून त्यामध्ये ६५ वर्षांवरील चालकांसाठी सन्मान निधी, कर्तव्यावर असताना जीवन विमा व अपंगत्व विमा संरक्षण, आरोग्यविषयक लाभ, कौशल्यवृद्धी प्रशिक्षण, कर्तव्यावर दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे.

या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र चालक-मालकांना मिळावा यासाठी बस, टुरिस्ट टॅक्सी आणि ऑटो चालक-मालकांनी कल्याणकारी मंडळाचे सभासदत्व घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version