डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस आता ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार
हरितक्रांतीच्या जनकाला राज्य शासनाची अनोखी मानवंदना; शाश्वत व हवामान-अनुकूल शेतीला मिळणार चालना
नशिराबाद | प्रतिनिधी
भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या ७ ऑगस्ट या जन्मदिवसानिमित्त राज्यभर दरवर्षी ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्याबरोबरच शाश्वत आणि हवामान-अनुकूल शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
डॉ. स्वामीनाथन यांनी भारतीय शेतीत वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या संशोधनामुळे देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकला.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन : थोडक्यात
-
जन्म: ७ ऑगस्ट १९२५
-
निधन: २८ सप्टेंबर २०२३
-
ओळख: भारताच्या हरितक्रांतीचे जनक, ‘फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी’
-
महत्त्वाची जबाबदारी: राष्ट्रीय शेतकरी आयोग (स्वामीनाथन आयोग) अध्यक्ष, २००४
-
राज्यसभा सदस्य: २००७ ते २०१३ (नामनिर्देशित)
प्रमुख पुरस्कार
-
१९६१ – शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
-
१९६७ – पद्मश्री
-
१९७१ – रॅमन मॅगसेसे पुरस्कार
-
१९७२ – पद्मभूषण
-
१९८६ – अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार
-
१९८७ – जागतिक अन्न पुरस्कार (World Food Prize)
-
१९८९ – पद्मविभूषण
-
२०२४ – भारतरत्न (मरणोत्तर)
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी, कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना शाश्वत शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. तसेच, डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषीविषयक विचारांचा प्रसार करून भावी पिढीमध्ये शाश्वत शेतीबाबत जनजागृती करण्यासही या उपक्रमाची मदत होणार आहे.
