जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सोन्याची साखळी हिसकावली, तिघांविरुद्ध गुन्हा
जामखेडमध्ये खर्डा चौकातील घटना; एका आरोपीला अटक, दोघांचा शोध सुरू
अहिल्यानगर | प्रतिनिधी (बापुसाहेब घोडेस्वार)
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात जुन्या वादातून एका २६ वर्षीय तरुणावर कोयता व वीटाने जीवघेणा हल्ला करून त्याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकिब इलाही आत्तार (वय २६, रा. जामखेड) हे २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता खर्डा चौकातील एका चहाच्या दुकानासमोर मोटारसायकलवर बसले होते. त्यावेळी गुड्डू खान (पूर्ण नाव अज्ञात), आमीर तैमुर खान आणि समीर तैमुर खान हे तेथे आले.
यावेळी “तू आमच्याकडे रागाने का पाहतोस?” या कारणावरून वाद झाला. त्यानंतर गुड्डू खान याने हातातील नारळ सोलण्याच्या कोयत्याने आकिब आत्तार यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. फिर्यादी बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना आमीर तैमुर खान आणि समीर तैमुर खान यांनी वीटाने पाठीवर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले.
यावेळी आरोपींनी “आमच्या नादी लागलास तर तुझे तुकडे करू” अशी धमकी दिल्याचाही फिर्यादीत उल्लेख आहे. झटापटीदरम्यान फिर्यादीचा मोबाईल फोनही गहाळ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
एका आरोपीला अटक
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान समीर तैमुर खान (वय ३८, रा. सदाफुले वस्ती, जामखेड) हा शहरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शिवाजी कदम करीत आहेत.
