Spread the love

तालुका आरोग्य विभागाचा जनजागृती उपक्रम; बालकवी ठोंबरे विद्यालयात हत्तीरोग प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन

‘हत्तीरोगमुक्त धरणगाव’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण

धरणगाव | प्रतिनिधी

हत्तीरोगमुक्त धरणगाव घडविण्याच्या उद्देशाने तालुका आरोग्य विभागाच्या वतीने धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी हत्तीरोग (फायलेरियासिस) प्रतिबंध आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची माहिती, त्याची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधवआरोग्य सहाय्यक आधार भोई आणि एमपीडब्ल्यू पी. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना हत्तीरोगाचा प्रसार, डासांपासून बचावाचे उपाय तसेच शासनाच्या मास ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (MDA) मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिबंधक गोळ्या नियमितपणे घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी रात्री मच्छरदाणीचा वापर, परिसरात पाणी साचू न देणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि स्वच्छ परिसर ठेवणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास एमपीडब्ल्यू मयूर पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेवटी विद्यार्थ्यांनी “हत्तीरोगमुक्त परिसर, स्वच्छ परिसर” हा संकल्प करून आपल्या कुटुंबात आणि समाजात स्वच्छता व आरोग्यदायी सवयी रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version