मुंबई मध्य RTO मध्ये दुचाकींसाठी ‘MH 01 FL’ नवीन मालिका सुरू; पसंतीचा क्रमांक आरक्षित करण्याची संधी
‘MH 01 FK’ मालिका संपल्याने नवीन मालिका लागू; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी (हर्षल पाटील)
प्रादेशिक परिवहन कार्यालय (मुंबई मध्य) येथे दुचाकी खाजगी वाहनांसाठी ‘MH 01 FL’ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेली ‘MH 01 FK’ मालिका संपत आल्याने ही नवीन मालिका लागू करण्यात येत असून, वाहनधारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक आगाऊ शुल्क भरून आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१० ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील सुधारित नियम ५४ (अ) नुसार वाहनधारकांना पसंतीचा क्रमांक आरक्षित करता येणार आहे.
-
अर्ज करण्याची अंतिम मुदत: १० ऑगस्ट २०२६, दुपारी १२.०० वाजेपर्यंत
-
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण: RTO मुंबई (मध्य) कार्यालय, खिडकी क्रमांक E-11
-
संपर्क अधिकारी: श्री. ऑल्विन पॉल
विहित नमुन्यात अर्ज करून आवश्यक शुल्क भरल्यानंतर क्रमांक आरक्षणाची पावती दिली जाईल.
एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास लिलाव
एखाद्या पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता लिलाव (Auction) पद्धतीने संबंधित क्रमांक वाटप करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
-
फोटो असलेले ओळखपत्र
-
निवासाचा पुरावा
-
पॅन कार्ड
-
वाहन खरेदीची पावती (Purchase Invoice)
महत्त्वाच्या अटी
-
आरक्षण शुल्क “प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य)” यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे भरावे लागेल.
-
आरक्षित नोंदणी क्रमांकाची १८० दिवसांपर्यंत वैधता राहील.
-
या कालावधीत संबंधित वाहनाची नोंदणी करणे आवश्यक असेल.
-
‘वाहन-04’ प्रणालीमध्ये आरक्षणाची नोंद झाल्यानंतरच संबंधित क्रमांक अधिकृतपणे वाहनास देण्यात येईल.
नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी केले आहे.
