Spread the love

शहदा बस स्थानकावर सायंकाळी टवाळखोरांचा धुडगूस; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत छेडछाडीच्या घटनांत वाढ; सायंकाळी ५ ते ६ दरम्यान नियमित पोलीस गस्तीची पालकांची मागणी

शहदा | प्रतिनिधी (सोमेश मुळे)

शहदा येथील मुख्य बस स्थानक परिसरात सायंकाळी शाळा आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत टवाळखोरांकडून विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

दररोज सायंकाळी सुमारे ५ वाजता शहरातील विविध शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर ग्रामीण भागात जाण्यासाठी शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी बस स्थानकावर गर्दी करतात. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही टवाळखोर तरुण बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित तरुणांकडून मोठ्याने आरडाओरड करणे, दुचाकी भरधाव व बेदरकार चालवणे, बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थिनींवर अश्लील शेरेबाजी करणे तसेच गर्दीचा फायदा घेऊन छेडछाड करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही चिंता व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असूनही अद्याप प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई झालेली नाही. त्यामुळे सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बस स्थानक परिसरात नियमित पोलीस गस्त व कडक बंदोबस्त ठेवावा, टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version