Spread the love

चोपड्यात अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ₹१.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

घरगुती एलपीजी सिलिंडरमधून बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; एक आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल

चोपडा | प्रतिनिधी (राहुल पाटील)

चोपडा शहरात घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत ₹१ लाख ३६ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे छापा

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लोहाना पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या पडिक शेडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस अत्यंत धोकादायक पद्धतीने इतर सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत प्रमोद विजय महाजन (वय ३६, रा. अरुण नगर, चोपडा) याला रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले.

₹१.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

छाप्यात पोलिसांनी गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. त्यामध्ये:

  • २ इलेक्ट्रॉनिक मोटारयुक्त गॅस रिफिलिंग यंत्रे

  • २ इलेक्ट्रॉनिक वजनकाटे

  • इंडियन कंपनीचे घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर

  • एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,३६,५००

गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पंकज ठाकूर यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७, २८८ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version