Spread the love

चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, आरोपी अटकेत

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; ३० हजारांची चोरीची मोटारसायकल हस्तगत

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील महामार्ग क्रमांक ३ वरील लकबँक हॉटेलसमोरून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत चाळीसगाव रोड पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मजीद मुसा शाह (रा. ऐशीफुटी रोड, नुरानी मशिदजवळ, धुळे) यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न (क्र. MH-18/SB-1525) ही मोटारसायकल ३० जुलैच्या मध्यरात्री ते ३१ जुलैच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तपासादरम्यान ७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शंभर फुटी रोडवरील डी-मार्ट परिसरात सापळा रचून नूर मोहम्मद इस्तेयाक अहमद अन्सारी (रा. रमजानपुरा, मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंदअपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विवेक पवारपोउनि. संदीप काळे तसेच पोलीस कर्मचारी निलेश देवरे, सिराज खाटीक, राकेश मोरे, धिरज सांगळे आणि इंद्रजित वैराट यांनी केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version