Spread the love

बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १५ आरोपींचा जामीन रद्द; सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार – पंकज साळुंखे

बोगस शिक्षकांच्या वेतनाविरोधातही कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा; राज्यभर चौकशीची मागणी

धुळे | प्रतिनिधी

बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील १५ आरोपींचा जामीन न्यायालयाने रद्द केला असून, या प्रकरणात न्यायालयाने गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदविले आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे महामंत्री पंकज साळुंखे यांनी दिली. या निर्णयाविरोधात संबंधित आरोपी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बनावट शालार्थ आयडीचे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत असून, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान माजी शिक्षणाधिकाऱ्यांसह काही महत्त्वाच्या व्यक्तींवर कारवाई झाल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

बोगस शिक्षकांच्या वेतनाविरोधातही सर्वोच्च न्यायालयात जाणार

बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या कथित बोगस शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनाच्या मुद्द्यावरही कायदेशीर लढाई उभारण्यात येणार असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील संबंधित न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात आपल्याला धमक्या येत असल्याचा दावा करत, तपास पूर्ण होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

बोगस मान्यतांचीही चौकशी करण्याची मागणी

शालार्थ आयडीप्रमाणेच राज्यात बोगस मान्यता मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचा आरोपही साळुंखे यांनी केला. नाशिक विभागात ज्या पद्धतीने शालार्थ आयडी आणि मान्यतांच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे, त्याच धर्तीवर राज्यातील इतर विभागांमध्येही पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती पंकज साळुंखे यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version